कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात कोल्हापूर विभागाने उताऱ्यात अन्य विभागांना मागे टाकले आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजेच ११.५ टक्के इतका सरासरी साखर उतारा कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांना उताऱ्याच्या आधारावर चांगला दर पदरात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम संपला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखाने अद्याप सुरु आहेत. यंदाच्या ऊस गळीत हंगामात राज्यात साखरेचा सरासरी उतारा ०.२० टक्क्यांनी वाढून १०.१७ टक्के इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या मार्च अखेरपर्यंत हाच उतारा हा ९.९७ टक्के होता. वाढलेल्या सरासरी उताऱ्यात कोल्हापूर विभागाचे मोठे योगदान आहे.
उसाचा किमान आधारभूत दर हा साखरेच्या उताऱ्यानुसार निश्चित होत असल्याने उतारा सर्वाधिक असलेल्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उसाचा दर वाढण्यास मदत होणार आहे. सरासरी साखर उताऱ्याच्या टक्केवारीत कोल्हापूर विभागापाठोपाठ नांदेड विभाग दुसऱ्या, तर पुणे विभाग तिसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यात सर्वांत कमी ५.८१ टक्के इतका साखर उतारा नागपूर विभागातील कारखान्यांचा आहे. साखर कारखान्यांचे राज्यात एकूण आठ विभाग असून सर्व विभागांतील मिळून २०७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू केला होता. बहुतांश कारखान्यांचा गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विभागातील कुठला कारखाना सर्वात जास्त दर देणार ? याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.