लखीमपुर : चीनी मंडी
खिरी लोकसभा मतदारसंघातील गोला विभागाअंतर्गत बिजोरियाच्या ऊस उत्पादक शेतकरी, ग्रामस्थांनी ऊस बिले न मिळाल्याने लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गावामध्ये आणि रेल्वे क्रॉसिंगपासून गावाकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी अशा निर्णयाचे फलक लावण्यात आले आहेत. गावच्या या निर्णयामुळे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोलामधील लखीमपूर मार्गावरील बिजोरिया गावाची नोंद नवादा राजस्वा गाव म्हणून करण्यात आली आहे. गावातील १२५० मतदारांनी ऊस बिले न मिळाल्याने मतदान न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अशा स्वरुपाचे फलकही गावात ठिकठिकाणी लावले आहेत.
गावातील ७३ वर्षिय निवृत्त शिक्षक तथा शेतकरी बृजलाल वर्मा यांच्यासह शेकडो शेतकरी ऊस बिले न मिळाल्याने अस्वस्थ आहेत. याशिवाय मोकाट जनावरांकडून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोकाट जनावरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री जागून काढाव्या लागत आहेत. जनावरांकडून होणारे नुकसान, कारखान्यांकडून थकलेली ऊस बिले यामुळे शेतकरी वैतागले आहेत.
गावकऱ्यांचा आरोप आहे की भारतीय जनता पक्षाने उसाची बिले शेतकऱ्यांना १४ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. आता चार महिने उलटून गेले तरी नोव्हेंबर २०१८ मधील ऊस बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी मतदानच करणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी हरिश्चंद्र, जीवन लाल, हरद्वारी लाल, रामस्वरूप, रमेश, कामता प्रसाद, दिनेश कुमार, लालजी प्रसाद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp