लातूर : मराठवाड्यात सर्वाधिक साखर कारखाने लातूर जिल्ह्यात आहेत.पण यंदा ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय घट झाल्याने साखर कारखानदारांनाच शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची वेळ येणार असल्याचे चित्र आहे. गतवर्षीपेक्षा तब्बल १६ हजार हेक्टरने क्षेत्र घटले आहे. अत्यल्प पावसाचा परिणाम हंगामनिहाय ऊस लागवडीवरही झाला आहे.
जिल्ह्यात ३५ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असताना गेल्यावर्षी तब्बल ५२ हजार हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. पण यंदा सरासरीही ओलांडता आलेली नाही. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीपेक्षा चारापिके आणि अल्पावधीत येणाऱ्या भाजीपाल्यावरच भर दिला आहे. १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीतील आडसाली लागवडीत जिल्ह्यात केवळ २४. २ हेक्टरवर लागवड झाली. तर पुर्व हंगामी काळात ६ हजार ४०४ हेक्टरवर लागवड झाली आहे. १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या काळातील हंगामी ऊस लागवडही अत्यल्प आहे. शेतकऱ्यांनी खर्च टाळून खोडव्यावर लक्ष दिले आहे.