जळकोट : जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला खोडाचा ऊस मोडीत काढला असून नवीन उसाची लागवडदेखील बंद केली आहे. पाणीच नसल्याने तालुक्यातील उसाचे क्षेत्र घटले आहे. याचबरोबर यावर्षी शेतकऱ्यांच्या उसाची वेळेवर तोडणी झाली नाही. पाठपुरावा करूनही वेळेत ऊस कारखान्याकडे गेला नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. उसाचे वजनही कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. त्यातून हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी उसच लावायचा नाही असा भूमिका घेतली आहे.
तालुक्यात तीन ते चार हजार हेक्टर उसाचे क्षेत्र होते. एकूण ३४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २५००० क्षेत्र पेरणी योग्य आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी ही पिके वगळून शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी उसाचे क्षेत्र ठेवले होते. मात्र पाणीच नसल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी ऊस शेतीकडे लक्ष दिल्याने उसाचे क्षेत्र वाढले होते. मात्र, पाण्याची कमतरता, कारखान्यांचे गैर व्यवस्थापन यांचा उसाला मोठा फटका बसला आहे. परिणामी यंदा सुमारे ५० ते ६० टक्के उसाचे क्षेत्र घटले आहे. आता खरिपावरच शेतकऱ्यांची मदार आहे. तालुक्यातील माळहिप्परगा, डोंगरगाव, रावणकोळा, सोन- वळा, करंजी हे साठवण तलाव सोडले तर जंगमवाडी, वांजरवाडा, जळकोट, शेलदरा, ढोरसांगवी, चेरा, गुत्ती, कोनाळी डोंगर, केकत सिंदगी, जगळपूर येथील साठवण तलाव व पाझर तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ऊस उत्पादन करण्याची हिम्मतच राहिली नाही.