कोल्हापूर : यंदा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात आतापर्यंत १० हजार हेक्टरने घट झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्याचा फटका ऊस उत्पादनाला बसला आहे. घातलेल्या ऊस क्षेत्राचा परिणाम साखर कारखान्यांच्या पुढील गळीत हंगामावर होण्याची शक्यता आहे. कारखान्यांची गाळप क्षमता वाढली असली तरी उसाअभावी कारखाने लवकर बंद करण्याची वेळ कारखानदारांवर येऊ लागली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत ऊस क्षेत्रात आतापर्यंत १० हजार हेक्टर घट झाली आहे. खोडव्याचे क्षेत्र ७४ हजार हेक्टरपर्यंत आहे. तर पूर्वहंगामी लावण सध्या ४० हजार ७०२ हेक्टरवर आहे. सुरूची लागण ४० हजार ९०७ हेक्टर आहे. गेल्यावर्षी १ लाख ९० हजार हेक्टरवर उसाची लावण झाली होती. हे क्षेत्र आधीच्या वर्षाच्या क्षेत्रापेक्षा १० ते १२ हजार हेक्टरने जास्त होते. मात्र खरीप हंगामात पावसाने दांडी मारली आणि शेतकऱ्यांना फटका बसला. मध्यंतरी ऑक्टोबर महिन्यातील पावसाने ऊस पिकाला थोडा दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर पाऊस आला नाही. त्याचा फटका नव्या ऊस लावणीला बसला आहे.