नवीन गाळप हंगाम सुरू झाला आहे. कारखान्यांकडूनमागील हंगामातील थकबाकी लवकरात लवकर दिली जावी आणि चालू हंगामातील उसाची बिले देण्यास कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता सरकारच्यावतीने घेतली जात आहे.
सरकारकडून देण्यातआलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, ऊस आणि साखरेबाबतच्या योग्य सरकारी धोरणांमुळे, साखर कारखान्यांनी सुमारे १.०९ लाख कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. साखर हंगाम २०२२-२३ मधील उसाच्या थकबाकीपैकी ९५ टक्क्यांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे. मागील हंगामातील उसाची थकबाकी ९९.९ टक्के अदा करण्यात आली आहे. त्यामुळे उसाची थकबाकी आजवरच्या नीचांकी पातळीवर असून, उर्वरित थकबाकी लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
इथेनॉलबाबत, सरकारने सांगितले की, ईएसवाय २०२२-२३ मध्ये भारताने सुमारे ४३ एलएमटी साखर इथेनॉलकडे वळवली आहे. यातून साखर-आधारित डिस्टिलरीसाठी सुमारे २४,००० कोटी रुपयांचा महसूल मिळेल. या महसुलामुळे साखर उद्योगाला शेतकऱ्यांची उसाची थकबाकी वेळेवर देण्यास आणि साखर क्षेत्राला स्वावलंबी बनविण्यास मदत झाली आहे.