अमरोहा : साखर कारखान्यांकडून उसाच्या थकबाकीत दिरंगाई केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे साखर कारखान्यांकडे २९३ कोटी रुपये थकीत आहेत. गेल्यावर्षीच्या दरानुसार पैसे दिले जात आहेत. जर उसाच्या दरात वाढ झाली तर थकबाकीच्या रक्कमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ऊसाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यास उशीर होत असल्याने ऊस उपायुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना त्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. जर पैसे देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा झाली नाही, तर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात उसाची ९४ हजार ९५२ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. येथील ऊस ११ साखर कारखाने खरेदी करतात. त्यापैकी जिल्ह्यात तीन साखर कारखाने आहेत. ऊस वजन केंद्रांमधून ऊस संबंधीत कारखान्यांना पाठवला जातो. राज्य सरकारने ऊस खरेदीस गती द्यावी अशा सूचना दिल्या आहेत. आतापरर्यंत २९४ लाख क्विंटल उसाची खरेदी झाली आहे. मात्र, साखर कारखान्यांकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते.
भारतीय किसान युनीयनच्या विविध शाखांसह शेतकऱ्यांनी ऊसाचा दर ४५० रुपये प्रतिक्विंटल करण्याची मागणी केली आहे. मात्र साखर कारखान्यांनी २०१९-२०च्या दरानुसारच पैसे देण्यास सुरुवात केली आहे. खरेतर ऊस खरेदी केल्यानंतर चौदा दिवसांत पैसे देणे अपेक्षित आहे. मात्र, या मुदतीत पैसे दिल्याचे दिसून येत नाही. राज्य समर्थन मूल्यानुसार (एसएपी) ऊसाची किंतम ८१९.२९ कोटी रुपये झाली असल्याचे सांगण्यात येते. मात्र आतापर्यंत फक्त ५२६.१२ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत. ऊस उपायुक्त अमर सिंह यांनी ऊस बिले किती शेतकऱ्यांना दिली गेली आहेत, याचा आढाव घेतला. यावेळी वास्तव उघडकीस आले. त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना ऊस बिले देण्यास गती देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना नोटिसाही बजावल्या आहेत. यात सुधारणा झाली नाही तर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.