सांगली : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसमोर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रुपाने आव्हान उभे ठाकले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील या संघटनेने ऊसाचे थकबाकी आणि एफआरपीचे तुकडे पाडून पैसे देण्याविरोधात राज्यातील मंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, आठवड्यापर्वी संघटनेच्या काही सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे कार्यकर्ते वाळवा तालुक्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यासमोर आंदोलन करणार होते. राजारामबापू कारखान्याने खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे (एफआरपी) हफ्त्यांमध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८७ पैकी ९७ कारखान्यांनी अशा प्रकारे हफ्त्याने पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत करार केला आहे.
राजारामबापू कारखान्यासमोर आंदोलन करण्यासाठी गेलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. शेट्टी हे आंदोलनाचे नेतृत्व करीत होते. त्याचवेळी त्यांनी २२ मार्च रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याविरोधात आंदोलनाची घोषणा केली.
गळीत हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात कारखान्यांकडे २३०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी १३ कारखान्यांची संपत्ती जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारखान्यांकडून आता पैसे वसुली होणार आहे.