पाटणा : महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या मॉडेलची पाहणी करून तशाच पद्धतीने बिहारमध्ये उद्योग विस्तारला जाईल असे प्रतिपादन सहकार मंत्री डॉ. सुरेंद्र यादव यांनी केले. मंगळवारी पॅक्सोमध्ये सदस्यांच्या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा उद्योग सध्या मोजक्या लोकांच्या हाती आहे. त्याचा विस्तार होण्याची गरज आहे असे ते म्हणाले.
प्रभात खबरमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्र्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील गावागावात जावून तेथील शेतकरी कोणते ऊस बियाणे वापरतात, ते पाहावे. ज्यापासून अधिक रस निघतो अशा बियाण्यांची निवड करावी. बिहारमध्येसुद्धा उसावर आधारित छोट्या उद्योगांतून लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकेल. यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. याचबरोबरच मंत्र्यांनी गोदामांचा आकार वाढवावा यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कुमार सिंह यांनी सांगितले की, जिल्हा स्तरावरही प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी राजेश मिणा यांच्यासह शशी शेखर, सुभाष, कामेश्वर ठाकूर, शंभु कुमार सेन आदी अधिकारी उपस्थित होते.