फगवाड़ा : भारतीय किसान युनियन दोआबा गटाच्यावतीने ७२ कोटी रुपयांच्या ऊस बिलांच्या थकबाकीपोटी फगवाडा साखर कारखान्यासमोर सुरू असलेले धरणे आंदोलन १७ व्या दिवशीही सुरुच आहे. आज, या आंदोलनात शेतकरी नेते कृपाल सिंह मुसापूर, दविदर सिंह संधवा, त्रिलोक सिंह व हरविदर सिंह मानावाली यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारने शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले त्वरीत बँक खात्यांमध्ये जमा करावीत असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नेते कृपाल सिंह मुसापूर यांनी सांगितले की, पंजाब सरकारवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. दोन सप्टेंबरपर्यंत २४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होतील असे आश्वासन देण्यात आले आहे.
जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृपाल सिंह यांनी गुरुद्वारा सुखचैनआणा साहिब येथे वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित केली असल्याचे सांगितले. सरकारच्या आश्वासनानंतर संयुक्त किसान मोर्चाचे राज्यस्तरीय आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र, जोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपले थकीत ७२ कोटी रुपये मिळत नाहीत आणि फगवाडा साखर कारखान्याची दुरुस्ती सुरू होत नाही, तोपर्यंत फगवाडा जीटी रोडवरील हे आंदोलन सुरूच राहिल असे त्यांनी सांगितले.