देशभर लोक दीपावलीचा सण साजरा करीत आहेत. मात्र, माजी मंत्री राधेश्याम सिंह यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साखर कारखान्यांनी थकवलेल्या ऊस बिलांप्रश्नी आंदोलन केले. कुशीनगरमधील कप्तानगंज साखर कारखान्याकडील ४४ कोटी रुपयांची थकबाकी मिळावी या मागणीसाठी कप्तानगंज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनासाठी आलेल्या माजी राज्यमंत्री राधेश्याम सिंह यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी लाठीचार्ज करत शेतकरी आणि कार्यकर्त्यांना तहसील कार्यालयाबाहेर काढत कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांना कुलूप ठोकले.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री राधेश्याम सिंह यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, पोलिसांनी आंदोलनस्थळी घुसून माजी मंत्र्यांना अटक केली. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या इतर नेत्यांनी कुशीनगरातील रविंद्रनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत राधेश्याम सिंह यांच्या सुटकेची मागणी केली. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. कुशीनगरातील कनोडिया साखर कारखाना, कप्तानगंजकडे गेल्या वर्षीचे ४४ कोटी रुपये थकीत आहेत. हे पैसे त्वरीत मिळावेत अशी मागणी करण्यात आली. ऐन दिवाळीत झालेल्या या आंदोलनामुळे गोंधळ उडाला. दीवाळीतही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.