कोल्हापूर : आजरा साखर कारखान्याने प्रती टन ३,१०० रुपये याप्रमाणे १५ नोव्हेंबरअखेर गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांनी दिली. यंदाच्या हंगामात कारखान्याने ३.५० लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती म्हणाले की, कारखान्याने बीड व स्थानिक तोडणी वाहतूक यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या संपूर्ण ऊसाची बिले विनाकपात एक रक्कमी दिली आहेत. शेतकऱ्यांनी तोडणी स्वतः कडून दिल्यास कारखान्याकडून वाहन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होईल. कारखान्याकडून वाहतुकीची बिलेही नियमितपणे अदा केली जाणार आहेत. आता शिल्लक ऊस गाळपास आणण्याचे नियोजन केले आहे. उत्पादकांनी सर्व ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे.