कोल्हापूर : चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याने १ ते १५ जानेवारीअखेर गळीतास आलेल्या ६२,९७१ मे. टन ऊसाच्या बिलापोटी १६ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहेत. कारखान्याने गळीतास आलेल्या ऊसास प्रती टन ३,१५० रुपये दर दिला आहे. कारखान्याने १५ जानेवारी अखेरची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहेत, अशी माहिती चेअरमन तथा खासदार संजय मंडलिक यांनी दिली आहे. चालू वर्षी ५ लाख टन गाळपाचे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
चेअरमन मंडलिक यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याने २० फेब्रुवारीअखेर ३,८१,९३० मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. आतापर्यंत ४ लाख ३८ हजार १०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.६१ टक्के आहे. हंगामामध्ये १ कोटी ५६ लाख ६७ हजार २०० युनिट वीज उत्पादन करून राज्य वीज वितरण कंपनीस निर्यात केली आहे. कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्पात १४ लाख २२ हजार १२९ लिटर स्पिरिटचे उत्पादन केले आहे. यावेळी व्हाईस शिवाजीराव इंगळे, संचालक प्रकाश पाटील, विश्वास कुराडे, आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील, महेश घाटगे, माजी संचालक नंदकुमार घोरपडे, भगवान पाटील, विनायक तुकान, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील आदी उपस्थित होते.