कोल्हापूर : चालू हंगामात कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १५ फेब्रुवारीअखेर गाळप झालेल्या उसाचे २४ कोटी ७२ लाख २३ हजार रुपये बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले आहे. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी ही माहिती दिली. कारखान्याने प्रती टन ३२०० रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा केले आहे, असे त्यांनी सांगितले.
चेअरमन नरके यांनी सांगितले की, कारखान्याने १५ फेब्रुवारी अखेर गळीतास आलेल्या ७७ हजार २५७ मे. टन उसाची रुपये ३२०० प्रमाणे होणारी बिले संबंधित ऊस पुरवठाधारकांच्या बँक सेव्हिंग्ज खात्यावर वर्ग केली आहे. सर्व सभासद, बिगर सभासदांनी ऊस गळीतास पाठवून कारखाना गळीताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन, माजी आमदार नरके यांनी केले आहे. व्हा. चेअरमन विश्वास पाटील, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने व सचिव प्रशांत पाटील व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते