कोल्हापूर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत गळितास आलेल्या उसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले. ३१ जानेवारीपर्यंतची बिले बुधवारी (७) रोजी अदा करीत आहोत, अशी माहिती अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
चार डिसेंबरला कारखान्याचा हंगाम सुरू झाला. परंतु, तेव्हापासून कारखान्याने एकही बिले दिलेले नव्हते. त्यामुळे मार्चअखेरीस कर्जाची फिरवाफिरवी आणि प्रापंचिक कामे खोळंबल्याने शेतकऱ्यांत नाराजी होती. दरम्यान, जिल्हा बँकेने अर्थसहाय्य मंजूर केले. त्यातून ही बिले देण्यात येणार आहेत. गळीत हंगाम सुरळीतपणे सुरू असून कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांनी ऊस गाळपासाठी या कारखान्याला पाठवावा, असे आवाहनही डॉ. शहापूरकर यांनी केले आहे.