बहराइच : जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कडक भूमिका घेतल्यानंतर चिलवरिया साखर कारखान्याने सहा कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांनाअदा केली आहेत. दहा मार्चपर्यंत शेतकऱ्यांकडून गाळप केलेल्या ऊसाचे सर्व पैसे दिले जातील अशी माहिती कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिली.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करून पैशांसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अशावेळी चिलवरीया साखर कारखान्याने थोडाफार दिलासा दिल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी शंभू कुमार यांनी या कारखान्याकडे कोट्यवधी रुपये थकीत असल्याबद्दल कडक भूमिका घेतली होती. कारवाई संकेतही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक भूमिकेनंतर शेतकऱ्यांना पैशांचे वितरण करण्यात आले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक पी. एन. सिंह यांनी सांगितले की, शनिवारी साखर कारखान्याने सहा कोटी रुपयांची बिले अदा केली आहेत. ३१ जानेवारीअखेर ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवला आहे, त्यांना हे पैसे देण्यात आले आहेत. दहा मार्चपर्यंत सर्व थकबाकी अदा केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना गळीत हंगाम २०२०-२१ या कालावधीतील पैसे देण्याचे नियोजन व्यवस्थापनाने केले आहे.