रुडकी : शेतकऱ्यांना ऊस बिले देण्याबाबत ऊस आयुक्तांनी आढावा बैठक घेऊन यास गती देण्याचे निर्देश दिले. आतापर्यंत लिब्बरहेडी साखर कारखान्याने १७ डिसेंबरपर्यंत बिले दिली आहेत. लक्सर कारखान्याने १५ डिसेंबर आणि इक्बालपूर कारखान्याने १० डिसेंबरपर्यंतचे पैसे अदा केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जागरण डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ऊसाच्या थकबाकीबाबत ऊस आयुक्त हंसादत्त पांडे यांनी आढावा घेतला. सर्व साखर कारखान्यांनी नियमानुसार १४ दिवसांनी शेतकऱ्यांना बिले द्यावीत अशा सूचना त्यांनी दिल्या. ऊस बिले देण्यास उशीर करणाऱ्या कारखान्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. यासोबतच दर आठवड्याला ऊस बिलांचा आढावा घेतला जाईल असे ते म्हणाले. दरम्यान, सहाय्यक ऊस आयुक्त शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत लिब्बरहेडी कारखान्याने १७ डिसेंबरपर्यंतचे पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. कारखान्याने आणखी दहा दिवसांची बिले दिली जातील असे सांगितले. तर लक्सर साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतची बिले देण्यात आल्याचे सांगितले. इक्बालपूर कारखान्याच्यावतीने १० डिसेंबरपर्यंतची बिले देण्यात आली आहेत. उर्वरीत ऊस बिले लवकरच देऊ असे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, गेले तीन दिवस खराब हवामानामुळे साखर कारखान्यांचा ऊस पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कारखाने बंद आहेत. अद्याप यात सुधारणा झाली नसल्याचे सांगण्यात आले.