कोल्हापूर : ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यासाठी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना पुढील गळीत हंगाम २०२४-२५ साठी ‘खोडवा व निडवा ऊस पीक संगोपन प्रोत्साहन योजना राबविणार आहे. खोडवा, निडवा पिकासाठी शेतकऱ्यांना क्रेडिटवर ५००० रुपये किमतीचा जादा पावसाळी डोस बिनव्याजी देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी दिली. यावेळी शाहूचे ग्रुपचे अध्यक्ष, राजे समरजितसिंह घाटगे, उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांसह संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
श्रीमती घाटगे म्हणाल्या की, लागण ऊस पिकाच्या तुलनेत खोडवा व निडवा पिकाचा उत्पादन खर्च कमी येतो. शेतकऱ्यांना ही पिके किफायत ठरतात. यावर्षीच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत प्रोत्साहन म्हणून कारखाना व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाळी डोस म्हणून रासायनिक खतांचा डोस दिला जाईल. त्याची रक्कम ५००० रुपये आहे. पाचट कुजवण्यासाठी एकरी एक पोते युरिया व एक पोते सिंगल सुपर फॉस्फेट किंवा चार पोती शाहू, गांडूळ खत किंवा शाहू समृद्ध सेंद्रिय खत बिनव्याजी देण्यात येत आहे.