जळगाव : खानदेशात यंदा उसाचे गाळप अधिक होईल. तसेच साखरेचे अधिकचे उत्पादनही जादा दिसणार आहे. मार्च अखेरपर्यंत यंदा ऊस गाळप सुरू राहील, असाही अंदाज आहे. सध्या ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. सर्व कारखान्यांनी दर जाहीर केले असून, दिवाळीनंतर गाळप सुरू होईल, असे संकेत आहेत. खानदेशात अद्याप गाळप हंगाम सुरु झालेला नाही.
यंदा २३ लाख टन उसाचे गाळप यंदा होईल, अशी शक्यता आहे. विभागात ३५ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. जळगाव जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. धुळ्यात ५,००० हेक्टरवर ऊस आहे. थंडी वाढत असल्याने तोडणी पुढे सुरू होऊन वेग कायम राहील, अशी शक्यता आहे.
दरम्यान, नंदूरबार जिल्ह्यात यंदा चार कारखाने गाळप करतील. समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील कारखान्याचे सर्वाधिक १२ लाख टन ऊस गाळप होईल. पुरुषोत्तम नगर (ता. शहादा) कारखान्याकडून सुमारे तीन ते साडेतीन लाख टन, डोकारे (ता.नवापूर) येथील कारखान्याचे अडीच ते तीन लाख टन गाळप होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात तीन तर चाळीसगाव येथेही मागील वर्षी कारखाना सुरू झाला आहे. मुक्ताईनगर येथील कारखान्याचे गाळप जिल्ह्यात अधिक होण्याची शक्यता आहे.