दरभंगा : हसनपूर साखर कारखाना सन २०२०-२१ या हंगामात १६ मार्चपर्यंतच उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याने आतापर्यंत ५१ लाख ३६ हजार क्विंटल उसाचे गाळप केले आहे. कारखान्याला ५२ लाख क्विंटल ऊस मिळेल असा अंदाज आहे. मात्र, कारखान्याने ८० लाख क्विंटलचे गाळप करण्याचे उद्दीश्ट ठेवले होते. मात्र महापुरामुळे पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांसह कारखान्यांनाही मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
कारखान्यात गेल्या दहा दिवसांपासून दररोज पाच ते सात तास थांबून उसाचे गाळप केले जात आहे. सध्याच्या गळीत हंगामात कारखान्याने गाळप क्षमता वाढवली आहे. मात्र, यावेळी पाऊस जास्त झाल्यामुळे तसेच पाणी निचरा होण्याची सोय नसल्याने उसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाले आहे. यावेळी सुरुवातीच्या टप्प्यात उसाचे पिक चांगले होते असे ऊस विभागाचे उपाध्यक्ष वरीय शंभू प्रसाद राय यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्ही ८० लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे परिसरातील एक चतुर्थांश भागात पाणी साचून राहिले. त्याचा फटका पिकांना बसला. तब्बल १२ हजार एकरमध्ये शेतकऱ्यांनी ऊस पिकवला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह कारखान्यालाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कारखाना शेतकऱ्यांना सहकार्य करीत आहे. आतापर्यंत ५२ लाख क्विंटलचे गाळप करण्यात आले आहे.