पुणे : चीनी मंडी
आगामी २०१८-१९चा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या सूचना राज्याच्या साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक राज्यातील सर्व खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना देण्यात आले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. त्यात उसाचा गाळप हंगाम येत्या २० ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार राज्यातील सर्व साखर कारखान्यांना सूचना देण्यात येत आहेत. या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे. जर, कारखान्यांनी २० ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू केल्यास त्यांच्यावर बेकायदा गाळप केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासूनच सुरू होईल, अशी चर्चा होती. अतिरिक्त साखर साठ्यामुळे हंगाम लवकर सुरू करून पहिल्या टप्प्यात कच्ची साखर निर्यात करू द्यावी, अशी मागणी साखर उद्योगातून होत होती. मात्र आता हंगाम २० दिवस उशिरा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.