पैठण : सचिन घायाळ शुगर संचलित संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष तुषार शिसोदे, उपाध्यक्ष दत्तात्रय आमले यांच्या हस्ते बुधवारी (दि.27) कारखान्यातील गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. तत्पूर्वी कारखान्याच्या संचालिका मुक्ताबाई गोर्डे, दिगंबर गोर्डे यांनी बॉयलरचे पूजन केले.
यावेळी संचालक शिवाजी घोडके, कचरु बोबडे, विक्रमराव घायाळ, कार्यकारी अध्यक्ष अंबादास मोरे, सरव्यवस्थापक राजेंद्र काळे, व्यवस्थापक जी.पी. जाधव, व्यवस्थापक (निर्मिती) किरण शेलार, साखर कामगार युनियनचे पदाधिकारी रघुनाथ कळसकर, हमीद शेख, चंद्रकांत भागवत, थोरात, सुखदेव भालेकर, रमेश गायकवाड, शेतकरी अधिकारी म्हस्के, लेखापाल अशोक धर्मे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सचिन घायाळ म्हणाले, संत एकनाथ साखर कारखान्याचे यापूर्वीचे तीन गळीत हंगाम साखर कामगार व ऊस उत्पादक शेतकर्यांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाले आहेत. त्यामुळे यंदा कारखान्याने ऊसाला सर्वाधिक 2411 रुपये प्रति मेट्रीक टन भाव देण्याचे जाहीर केले आहे. सर्व पेमेंट वेळेवर केले जाईल. तुषार शिसोदे म्हणाले, नैसर्गिक संकटामुळे शेतकरी खचला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांच्या ऊसाला सचिन घायाळ शुगर कंपनी व्यवस्थापनाने दिलेला हा भाव मोठा अर्थिक आधार देणारा आहे. संत एकनाथ कारखान्याचा अचूक काटा शेतकर्यांचा फायदा करणारा असून, यासाठी कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन संचालक हरिभाऊ मापारी यांनी केले. यंदा ऊस दिलेल्या शेतकर्यांचा ऊस पुढील वर्षी कारखाना प्राधान्याने नेईल, असे संचालक आबासाहेब मोरे यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.