नंदुरबार : खानदेशात तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, चाळीसगाव, यावल आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या साहाय्याने उसाची शेती केली जाते. त्यातही खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे. नंदुरबारात सुमारे १६ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. तर शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊस पीक क्षेत्र चार ते सहा हजार हेक्टरदरम्यान होते. आता अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या शहादा तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. खानदेशात ऊस पिकाची लागवडही बऱ्यापैकी आहे. पीक स्थिती बरी आहे.
जळगावात उसाखाली सुमारे १४ हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तसेच धुळ्यातली पाच हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यातील शिरपूर, साक्री भागात ऊस पीक आहे. ऊस पीक अतिपावसाने काही भागात हवे तसे वाढले नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांनी जिद्दीने खत व अन्य बाबींचे व्यवस्थापन करून पीक वाढविले आहे. नंदुरबारात सर्वाधिक ऊस पीक आहे. तळोदा व शहादा तालुक्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे; परंतु त्या मानाने अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे. त्यामुळे ऊस पिकाला प्राधान्य दिले जात आहे.