सोलापूर : यंदा वरुणराजा कमी बरसल्याने शेतकऱ्यांनी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन ऊस शेतीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात ही स्थिती प्रकर्षाने जाणवत आहे. नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर, देवधर ही धरणे शंभर टक्के भरली नाहीत. त्यामुळे सरकारकडून पिकांसाठी किती पाणी उपलब्ध होणार याविषयी अनिश्चितता आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्याखालील अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड टाळली आहे. पाण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे पाठ फिरवली आहे.
शेतकऱ्यांनी ऊस पिकाऐवजी केळीच्या रोपांची मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडे नोंदणी केलेली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होईल, अशी रोपे विक्रेत्यांनी सांगितले. जनावरांसाठी चारा पिकांची लागवड होत आहे. मक्क्याची गंगा कावेरी, सुफलम सीड्स, सिजेंटा, हायटेक, ६२४०, पायोनियर या कंपन्यांची बियाणे विकली जात आहेत. जनावरांना मुरघास, चारा पिकांसाठी याचा वापर होत आहे. सध्या दुधाला दर नसला तरीही जनावरांसाठी चाऱ्याची गरज आहे. त्यासाठी अनेकांनी जनावरांसाठी चारा म्हणून मका पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे.