ऊस बांधणीमुळे उत्पादन, साखर उतारा वाढण्यास मदत

पिलिभीत : जून आणि जुलै महिन्यात ऊस पिकाची भरणी करणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे उसाची उत्पादकता व रिकव्हरी वाढविण्यासाठी उसाला बांधणेही फायदेशीर ठरते, असे मत जिल्हा ऊस अधिकारी खुशीराम यांनी व्यक्त केले. उसाचे चांगले पीक सुमारे २-२.५० मीटर लांबीपर्यंत पोहोचत असल्याने ऊस पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर या काळात उसाची बांधणी करावी, असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

उत्तर प्रदेशच्या पिलिभीत जिल्ह्यात सुमारे २.२६ लाखांपेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहेत, मात्र फक्त २५,००० शेतकरी ऊस बांधतात. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील जोरदार वारा आणि पावसामुळे ऊस न बांधल्याने पडतो. त्यामुळे उसाची वाढ थांबते. ऊस कुजण्याची शक्यता असते. पडलेल्या उसाचे उत्पादन घटण्याबरोबरच जवळपास ०.५ टक्के उताराही घटण्याची शक्यता असते. कमी सूर्यप्रकाश आणि हवा रोखली गेल्याने उसाचे उत्पादन कमी होते. हवा खेळती राहण्यासाठी उसाची बांधणी करणे फायदेशीर ठरते, असेही खुशीराम यांनी सांगितले.

खुशीराम म्हणाले की, उसाचे नुकसान टाळण्यासाठी त्याची बांधणी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करणे आवश्यक आहे. ऊस बांधण्यासाठी उसाचा खालच्या बाजूचा पाला वापरावा. पहिली बांधणी १५० ते १८० सें.मी. उंचीवर केली जावी, आणि दोन ते तीन ठिकाणी ऊस बांधला गेला पाहिजे. सध्या एलएच साखर कारखान्याच्यावतीने दुसऱ्या बांधणीसाठी हेक्टरी १,२५० रुपये मदत देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात उसाची विरुद्ध बाजूने बांधणी करावी, असे त्यांनी सुचविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here