नांदेड : यंदा नांदेड विभागात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली आहे. यावर्षी ८२ लाख ४८ हजार मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असून २०२४-२५ या हंगामात साखर कारखान्यांकडे २,१०,९९९ हेक्टर ऊस क्षेत्राची नोंदणी झालेली आहे अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे एकंदरीत उसाच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम साखरेचे उत्पादनही कमी होणार आहे.
यंदा नवीन गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल, अशी शक्यता आहे. प्रादेशिक कार्यालयांतर्गतच्या नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर या जिल्ह्यांपैकी नांदेड जिल्ह्यातून ३३ हजार ७३२ हेक्टर ऊसाचे क्षेत्र नोंदवले गेले आहे. हिंगोली जिल्ह्यातून २०,७५६ हेक्टर, परभणीत ५४,४०४ हेक्टर तर लातूर जिल्ह्यात १,०२,१०५ हेक्टर उसाचे क्षेत्र कारखान्यांकडे नोंदणी केलेले आहे. कृषी विभागाने १,१०,००० हेक्टर क्षेत्र अंदाजित केले आहे. विभागाची सरासरी उत्पादकता ६० ते ७० टन आहे. त्यात नांदेड जिल्ह्याची उत्पादकता ७० टन, हिंगोलीची ७० टन, परभणीची ६० तर लातूर जिल्ह्याची उत्पादकता ६५ टन आहे.