सांगली : सांगली जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार २०३ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. पाणी टंचाईमुळे पूर्व आणि सुरू हंगामातील ऊस लागवड करण्यासाठी शेतकरी सावध पावले टाकत आहेत. जिल्ह्यात वाळवा, मिरज, कडेगाव आणि पलूस तालुक्यात आडसाली हंगामातील ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तर दुष्काळी पट्ट्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी या तालुक्यांत शेतकरी सुरू आणि पूर्व हंगामी ऊस लागवड करतात. कृष्णा आणि वारणा नदीकाठी मे महिन्यापासून आडसाली उस लागवड केली जाते.
आटपाडी तालुक्यात उसाची लागवड सर्वांत कमी झाली असल्याचे चित्र आहे. वाळवा तालुक्यात १४ हजार ९५४ हेक्टरवर आडसाली उसाची लागवड झाली आहे. यंदा ऊस लागवड घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शेतकरी जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता पाहूनच ऊस लागवडीसाठी पुढे आले आहेत. पूर्व हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड करण्याचे नियोजन शेतकरी करत आहेत. त्यामुळे पूर्व आणि सुरू हंगामातील लागवडीस फारशी गती आली नाही.