सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने नेहमीच सभासद, शेतकऱ्यांचे, तोडणी वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांचे हित जोपासले आहे. कारखान्याने गेल्या वर्षी नियोजित विस्तारीकरण ठरवलेल्या वेळेत पूर्ण केले. तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने आजपर्यंतचे सर्व हंगाम यशस्वी केले आहेत. ऊस तोडणी, वाहतूक करणाऱ्या सर्व कंत्राटदारांनी कारखान्यास करार करून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मोहनराव कदम यांनी केले.
अध्यक्ष कदम यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर आगामी, २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी, वाहतूक करार करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी हणमंत सूर्यवंशी (रा. वांगी), हणमंत रुपनवर (रा. एकशिव), हारुण मुल्ला (रा. कराड), हणमंत जाधव (रा. शेळकबाव) आणि कृष्णत पवार (रा. शिवणी) या पाच तोडणी, वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांना कारखान्याचे अध्यक्ष कदम यांच्या हस्ते करारपत्र देण्यात आले. उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, संचालक रघुनाथराव कदम, शांताराम कदम, पी. सी. जाधव, पोपटराव महिंद, पंढरीनाथ घाडगे, जालिंदर महाडीक दिलीपराव सूर्यवंशी, भीमराव मोहिते, तानाजीराव शिंदे, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम आदी उपस्थित होते.