कोल्हापूर : कडाक्याच्या थंडीत ऊस तोडणी मजुरांचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यातही महिलांचे हालच होत आहेत. झोपडीत पहाटे चारला उठून स्वयंपाक करायचा. त्यानंतर नवऱ्यासोबत उसाच्या फडात जायचे. दिवसभर ऊस तोडायचा, मोळ्या बांधायच्या, रात्रीच्या थंडीत वाहने भरून पुन्हा वाहतूक सुरू करून द्यायची असे चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही उसाच्या फडात दिसून येत आहे. ऊस गाळप हंगाम गतीने सुरु असून बीड, लातूर, उस्मानाबादसह अन्य जिल्ह्यातून शेकडो उसतोड मजुराची कुटुंबे जिल्ह्यात स्थलांतरीत झाली आहेत.
उसाच्या फडातच या तोडणी कुटूंबांचा सहा महिने चालतो. यामध्ये महिला आणि लहान मुलांची फरपट होते. दिवसाला एक ट्रॅक्टर-ट्रक ऊस तोडण्याचे बंधन असते. त्यासाठी मुलांना पाचटावर टाकून आधी ऊस तोडणी आणि नंतर वाहन भरायची धावपळ करावी लागते. आपल्या गावापासून लांबवर आलेली ही कुटूंबे अतिशय कष्टप्रद जीवन जगतात. त्यातही महिला मजुरांच्या व्यथा अधिक कष्टचदायक आहेत.
सहा महिने गावाकडे आणि सहा महिने परजिल्ह्यात जाण्याने साऱ्या संसाराची फरफट होते. मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. उसतोड मजुरांकडून सांगण्यात आले कि, आमचा भाग दुष्काळी असल्याने शेतीत फारशी पिकत नाही. उदरनिर्वाहासाठी ऊस तोड हाच पर्याय आहे.