सोलापूर : करमाळा तालुक्यातील शेकडो ऊस वाहतूकदारांची बीड, परभणी, कर्जत, पुसद या भागातील टोळी मुकादमांकडून ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत ऊस वाहतुकदारांनी केलेल्या तक्रारींनंतर करमळा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्याच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ऊस वाहतूकदारांचे ४० ते ५० गुन्हे दाखल करुन घेतले गेले, मात्र, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची बदली झाल्यानंतर याचा पुढील तपास झालेला नाही. त्यामुळे वाहनमालक हवालदिल झाले आहेत.
शेटफळ (ता. करमाळा) येथील शिवाजी नाईकनवरे यांनी भैरवनाथ शुगर व अंबालिका शुगर या कारखान्याकडे वाहतूक करार केला होता. यासाठी ऊस तोडणी मुकादम किरण भानुदास बर्डे (रा. राळेगण, ता. अहमदनगर) यांच्यामार्फत त्यांनी अहमदनगर, श्रीगोंदा व करमाळा तालुक्यांतील १४ ऊस तोडणी मजुरांसाठी १८ लाख ५० हजार रुपये अॅडव्हान्सही दिले होते. अॅडव्हान्स घेऊनही त्या मुकादमाने ऊस तोडणी मजूर कामावर आले नाहीत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यांनी करमाळा पोलिस ठाण्यात संबंधित मुकादम व मजुरांच्या विरोधात डिसेंबर २०२३ मध्ये तक्रार दिली. मात्र, सात महिन्यानंतरही काहीही झालेले नाही. फसवणुकीमुले आमच्यावर वाहने व जमिनी विकण्याची वेळ आली आहे असे शिवाजी नाईकनवरे यांनी सांगितले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.