कोल्हापूर : यंदाचा ऊस गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर २०२३ पूर्वी बैठक घेऊन आगामी तीन वर्षांसाठीचा नवीन त्रिपक्षीय सामंजस्य करार करा अन्यथा २६ सप्टेंबरपासून ऊस तोडणी, वाहतूक कामगार, मुकादम व वाहतूकदार बेमुदत संपावर जातील, असा इशारा महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड व राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिला.
कराड आणि जाधव म्हणाले कि, दर व मुकादमांचे कमिशन याविषयी २० ऑक्टोबर २०२० रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला होता. कराराची मुदत गत हंगामाबरोबरच संपली आहे. त्यामुळे आगामी तीन हंगामांसाठीचा नवीन त्रिपक्षीय करार करण्यासाठी राज्य शासनाचे प्रतिनिधी, साखर संघाचे प्रतिनिधी आणि ऊस तोडणी व ओढणी कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांची त्रिपक्षीय समितीची बैठक २५ सप्टेंबरपूर्वी घ्यावी. या बैठकीत हा नवीन करार करण्यासह विविध मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा २६ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष आबासाहेब चौगले, दिनकर पुरे, ज्ञानदेव वंजारे, रामचंद्र कांबळे, साताप्पा चांदेकर, बाबासाहेब साळोखे उपस्थित होते.