सहारनपूर: ऊसाचे बिल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या साखर कारखान्यांना ऊस विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. उसाचे थकीत पैसे देण्याच्या प्रक्रियेस गती आणण्याचे निर्देश देतानाच यात बेफिकीरपणा करणाऱ्या कारखान्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ६७६ कोटी रुपये कारखान्यांनी थकवले आहेत.
साखर कारखान्यांचे गाळप सत्र अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सहापैकी दोन साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. गांगनौली कारखाना दोन एप्रिल आणि गागलहेडी कारखाना सात एप्रिल रोजी बंद झाला आहे. आणखी दोन साखर कारखाने याच महिन्यात आणि आणखी दोन कारखाने पुढील महिन्यात गाळप पूर्ण करतील अशी शक्यता आहे. याशिवाय, जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ६७६ कोटी रुपये थकीत आहेत.
सहजवी गावातील बिट्टू नंबरदार, बिडवी गावातील सुधीर कुमार आदी शेतकऱ्यांनी सांगितले की, वेळेवर उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. सद्यस्थितीत उसाची लागवड केली जात आहे. त्याशिवाय मुलांच्या शिक्षणाला, कुटुंबातील आरोग्य सुविधांच्या खर्चासाठी खूप अडचणी येत आहेत. सरकारने कारखान्यांकडून पैसे मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे सुमारे ६७६.२५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तत्काळ पैसे देण्याची प्रक्रिया करावी असे निर्देश दिले आहेत. टाळाटाळ केलेल्या कारखान्यांविरोधात कडक कारवाई करू असा इशारा जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन त्रिपाठी यांनी दिला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील कारखान्यांनी १३५५.१५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला असून आतापर्यंत ६७८.९० कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर ६७६.२५ कोटी रुपये थकीत आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्यांना ४५६ लाख क्विंटल ऊस पाठवला असून जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा १०.४९ टक्के इतका आहे. जिल्ह्यात एकूण ४७.८७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.