लातूर : रेणापूर तालुक्यातील कारेपूर महसूल विभागात अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा आहे. पाण्याअभावी हा ऊस वाळत असल्यामुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिल्लक राहिलेला ऊस तातडीने कारखान्याने न्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील ऊस रेणा ट्वेन्टी वन या कारखान्याकडे जातो. मात्र यावर्षी रेणा सहकारी साखर कारखान्याने केवळ २५ टक्केच ऊस नेल्यामुळे या भागातील रामवाडी, व्हटी गोढाळा, लहानेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतावरच उभा आहे.
यंदा आंध्र प्रदेशातील बीदरचा गांधी सहकारी साखर कारखाना, गंगाखेड येथील गुट्टे यांचा गंगाखेड साखर कारखाना, केज तालुक्यातील बजरंग बप्पा साखर कारखाना व अहमदपूर तालुक्यातील बालाघाट साखर कारखान्यांनी या भागातील जवळपास ६० टक्के ऊस नेला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी या कारखान्यांना मालक तोड करून ऊस दिलेला आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिल्याने मोठा फटका बसला आहे. कारखान्यांनी जादा वाहनांची सोय करून शिल्लक ऊस न्यावा, अशी मागणी रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुरलीधर पडोळे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यांनी केली आहे.