पुणे : यंदा पावसाअभावी इंदापूर तालुक्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. साखर कारखानदारांकडून उसाचे उत्पादन घटल्याच्या पार्श्वभूमीवर उसाची पळवापळवी सुरू आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव व सोमेश्वर यांसह इतर खासगी कारखाने तालुक्यातील नीरा-भीमा, कर्मयोगी आणि छत्रपती या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस पळवीत आहेत. कारखानदार जादा दर देऊन शेतकऱ्यांना ऊस पुरवठा करण्यासाठी आकर्षित करीत आहेत. शेतकरीही जादा दर देईल, त्या कारखान्याला प्राधान्य देत आहेत.
यंदा इंदापूर तालुक्यातील छत्रपती कारखान्याने ३,००० रुपये पहिला हप्ता जाहीर केला. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतातील ऊस कारखान्याला लवकर तोडून घालवण्यासाठी शेतकऱ्यांचा कल आहे. तालुक्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तीन सहकारी आणि एक खासगी अशा चार साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. शेजारच्या बारामती आणि दौंड तालुक्यातील कारखान्यांनी इंदापूर तालुक्यात उसासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे ऊसदर देण्याची स्पर्धा सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा कारखाने गेट केनच्या शोधात कार्यक्षेत्राच्या बाहेर गेले आहेत, असे बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितले.