कोल्हापूर : यंदाचा हंगाम सुरू होऊन १३ दिवस झाले, परंतु अद्याप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. जिल्ह्यात यंदा स्वाभिमानी व आंदोलन अंकुश या दोन्ही शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. साखर कारखानदारांनी अद्याप संघटनेच्या मागण्या मान्य न केल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम सुरु होऊ शकलेला नाही. ऊस दराचा तिढा कधी सुटणार? राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेणार का ? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.
गेल्या हंगामातील ४०० रुपये मिळावेत आणि यंदाचा दर ३५०० रुपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानीने १७ ऑक्टोबरपासून ‘आक्रोश पदयात्रा’ काढली. उसाच्या दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘आर या पार’चा संघर्ष सुरू आहे. सर्व साखर कारखान्यांच्या दारावर कार्यकर्त्यांनी धडक मारली. जयसिंगपूर येथील ऊस परिषदेनंतर आता आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू आहे.
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखानदारांच्या घरी जाऊन त्यांना ‘खर्डा – भाकरी’चा फराळ देण्याचे आंदोलन केले गेले. मात्र अद्यापही साखर कारखानदारांनी गेल्या हंगामातील दुसऱ्या हप्त्याचे नावही काढलेले नाही. चालू आर्थिक वर्षाचा हिशेब झाल्यानंतर दुसऱ्या हप्त्याचा विचार करू, अशी भूमिका साखर कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरीही अस्वस्थ आहेत.