अमृतसर : पंजाबमध्ये साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत. राणा साखर कारखान्याकडून ऊस बिले न मिळाल्याने शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या (केएमएससी) बॅनरखाली शेतकऱ्यांनी अमृतसरपासून ४० किलोमीटर दूर बाबा बकालामध्ये अमृतसर-दिल्ली रेल्वे मार्ग रोखला.
हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी चार तासांहून अधिक काळ रेल्वे रुळावर ठाण मांडले. जोपर्यंत प्रशासनाने यात हस्तक्षेप केला नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहिले. अखेर प्रशासनाने साखर कारखान्याच्या मालकाकडून लवकरच थकबाकी मिळेल असे आश्वासन दिले. केएमएससीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सविंदर सिंह चौटाला म्हणाले, की आम्ही ऊस थकबाकीच्या मागणीसाठी यापूर्वी बाबा बकालाच्या उप जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले होते. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे आम्ही आज रेल रोको आंदोलन केले. कारखान्याच्यावतीने आगामी काळात थकबाकी देण्याबाबत आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले आहे.