कोल्हापूर : ऊस दराचा तिढा जर सरकार व कारखानदारांनी लवकर सोडवला नाही, तर शेतकरी स्वखर्चाने ऊस कारखान्याला पाठवून देतील. त्याला विरोध करणाऱ्यांना आडवे करू, असा इशारा शिरोळ, हातकणंगले तालुका ऊस उत्पादक शेतकरी समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी दिला. मंगळवारी ऊसप्रश्नी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शिरोळ तहसीलदार कार्यालयावर निर्धार मोर्चा काढला. गाळपाला उशीर होत असल्याने शेतकरी आणि कारखानदारांचेही प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी कारखान्यांना ऊस गाळपासाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे डांगे यांनी सांगितले. अन्य शेतकरी संघटनांचा विरोध डावलून गाळपाला ऊस पाठविण्यासाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
बेमुदत ठिय्या आंदोलना दरम्यान डांगे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या आडून लोकसभेचे राजकारण करत आहे, अशी टीका त्यांनी केली. माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याऐवजी मी दोन हात करायला तयार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, सरकारने दखल घेऊन तोडगा काढावा. गाळप हंगाम तातडीने सुरू करावा, अशी मागणी शेतकरी कृती समितीचे शिवाजीराव माने-देशमुख यांनी केली. यावेळी दादासो सांगावे, सुकुमार किनिंगे, विजय कुंभोजे, पोपट परीट, बाळासो वनकोरे, संपतराव चव्हाण, सुरेश सासणे, सुरेश पाटील, थंबा कांबळे, दिलीप माणगावे, रामचंद्र गावडे, केंदबा कांबळे, शंकर पाटील यांची भाषणे झाली.