तंजावर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी तंजावरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला. खासगी साखर कारखान्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. अनेक कारखानदारांनी कोट्यवधी रुपयांची ऊस बिले थकीत ठेवली असून ती देण्यास ते टाळाटाळ करीत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष रवींद्रन यांनी सांगितले की, थिरुमन कुडीमध्ये थिरु अरूरन साखर कारखान्याने चार वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे पैसे न देताच कारखाना बंद केला. कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जदार बनवून बँकांकडून कर्जे उचलली आहेत असा आरोप त्यांनी केला. नंतर दुसऱ्या पक्षाने कारखान्याची सत्ता मिळवली. मात्र, त्यांनीही शेतकऱ्यांची ऊस थकबाकीही दिलेली नाही आणि कर्जही फेडलेले नाही असे सांगण्यात आले.
रविंद्रन यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील जवळपास १५,००० लोक उपजिविकेसाठी संघर्ष करीत आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी २० दिवसांहून अधिक काळापासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी साखर कारखाना प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे. मात्र, आधीच्या सरकारप्रमाणे कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्वरीत कारवाई करण्याची गरज आहे. तरच शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी त्वरीत मिळेल.