कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा धरणात पाणी कमी असल्याने उपसाबंदी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी माळरान शेती असल्याने पाण्याची कमतरता भासत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात काही ठिकाणी वळीव पाऊस जोरदार बरसला असला तरी राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरात वळवाने हुलकावणी दिली आहे. धामणी नदी कोरडी पडली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या भागातील ऊस पिक वाळू लागल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांच्या मते, यंदा ऊस पीक अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. धामणी नदीवर स्वखर्चातून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यामधील पाणी संपल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे वळवाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, सध्या धामणी नदीच्या काठावरील तीन तालुक्यांतील २३ गावांना पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य भेडसावत आहे. नदी कोरडी पडल्याने स्वखर्चातून उभारलेले मातीचे बंधारे शेतकऱ्यांनी काढले आहेत. परिसरात सध्या उसाचे पीक समाधानकारक आहे. शेतकऱ्यांनी वर्षभर ऊस पीक घेण्यासाठी नदीवर मातीचे बंधारे घालून पाण्याच्या नियोजनासाठी उपसा बंदीचे वेळापत्रक तयार केले.