लखनौ:ऊस पिकाचा ‘कॅन्सर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल सड रोगाचा प्रादुर्भाव सहसा पावसाळ्यात होतो.ऊस शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांचे मते हा कोलेटोट्रिचम फाल्कॅटम नावाच्या बुरशीमुळे होणारा बुरशीजन्य हल्ला आहे. संक्रमित उसाच्या पानांचा रंग हिरव्या ते केशरी आणि नंतर तिसऱ्या किंवा चौथ्या पानांवर पिवळा होतो. त्यानंतर पाने खालून वरपर्यंत सुकायला लागतात.ज्याने उत्तर प्रदेशात साखर उत्पादनात मोठी क्रांती आणली त्या ऊसाच्या ‘को ०२३८’ जातीवर हा रोग प्रामुख्याने होतो.
बुधवारी तराई प्रदेशात लाल सड रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाभर बैठका सुरू केल्या.सहारनपूर येथील ऊस उत्पादक शेतकरी कटार सिंग यांनी सांगितले की, ‘को ०२३८’ रोगाच्या फैलावाची भीती असल्याने शेतकरी इतर उसाच्या वाणांची निवड करत आहेत.आपल्या भागात लाल सड रोगाचे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, वाईट परिस्थिती संपली आहे, कारण या भागातील उसाचे पीक पूर्वीपेक्षा चांगले आहे.
देशातील प्रमुख ऊस संशोधन संस्था, नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, कानपूर ऊस विकासाला गती देण्यास सर्वात आघाडीवर आहे.’एनएसआय कानपूर’च्या संचालिका डॉ.सीमा पारोहा यांनी सांगितले की, को ०२३८ चे क्षेत्रफळ हळूहळू ९० टक्क्यांवरून ५५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.शेतकरी को २३८ च्या जागी ऊसाचे इतर वाण वापरत आहेत.लाल सड रोग टाळण्यासाठी ऊस उत्पादकांनी कोणते उपाय अवलंबले पाहिजेत, याबद्दल त्यांनी सांगितले की बाधित रोपे काढून टाकणे, काढलेल्या जागेवर ब्लिचिंग पावडर शिंपडणे, ट्रायकोडर्माद्वारे माती प्रक्रिया करणे, पीक फेरपालट करणे आणि बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे.