अहिल्यानगर : साखर कारखानदारांनी ऊस बिले थकवल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. साखर आयुक्त, प्रादेशिक साखर सहसंचालक, उपसंचालक हे सरकारी अधिकारी साखर कारखानदारांच्या दावणीला बांधलेले गेले आहेत, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी केली. पोटे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अहिल्यानगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले होते. थकीत एफआरपी आणि व्याजासह ऊसाचे बिल कारखान्यांनी द्यावे, अशी मागणी केली होती. आंदोलनानंतर प्रशासनासह कारखान्यांना जाग का येते ? असा सवाल पोटे यांनी उपस्थित केला आहे.
पोटे यांनी सांगितले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य शेतकरी भरडला जात आहे. यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतातील ऊस कारखान्याला घालून देखील एफआरपीसह ऊसाचे बिल मिळत नाही. त्यामुळे २७ मे रोजी प्रहार संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी तत्काळ थकीत एफआरपी आणि व्याजासह ऊसाचे बिल अदा करण्यात यावीत असा आदेश प्रादेशिक उपसंचालकांनी काढला होता. याबाबत पोटे यांनी सांगितले की, व्याज व थकीत ऊस बिल साखर कारखान्यांनी न दिल्यास दोषी कारखान्यांना आगामी गळीत हंगामाचे परवाने साखर आयुक्तांनी देवू नयेत, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने अशा कारखान्यांना गळीत हंगामाचे परवाने दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पोटे यांनी दिला आहे.