पिलिभित : उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस या पिकाचे उत्पादन घेताना होणारे नुकसान कमी करण्यासाठी बहुपर्यायी पीक पद्धती स्वीकारली आहे. उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेच्या (UPCSR) अधिकृत आकडेवारीनसार वर्ष २०२२-२३ साठी प्रती हेक्टरी ऊस उत्पादन खर्च २,४१,३५६ रुपये आहे. तर शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा उत्पादन खर्च २,८५,००० रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये थेट शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी फक्त ऊस शेतीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी यासोबतच हरभरा पिक घेतले आहे.
द टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, UPCSR ने दर्शविलेल्या उसाच्या प्रती हेक्टरी उत्पादन ७७५ क्विंटल अनुसार सरकारी संस्थांद्वारे काढण्यात आलेला ऊस उत्पादन खर्च प्रती क्विंटल ३११.४२ रुपये आहे. तर शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की प्रती क्विंटल खर्च ३६८ रुपये येतो. शेतकऱ्यांनी सांगितले की, राज्य सरकारने ३५० रुपये प्रती क्विंटल ऊस दर (एमएसपी) निश्चित करून आमचे नुकसान केले आहे. एमएसपीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा गृहित धरून शेतकऱ्यांनी ऊस पिकाची लावण केली आहे. शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे ४०० रुपये प्रती क्विंटल एमएसपी मागितली आहे.