हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
बरखेडा (पीलिभीत, उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
साखर कारखान्याला देण्यासाठी ऊस घेऊन चाललेल्या शेतकऱ्याला मारहाण करून त्याचा ७० क्विंटल ऊस लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीसलपूर-पीलीभीत मार्गावर पतरासा कुंवरपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लुटणारी टोळी आठ जणांची होती त्यात चार महिलांचाही समावेश होता, अशी माहिती मिळाली आहे. या टोळीने रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्याला एका बागेत बांधून ठेवून ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसह ऊस पळवला. पळवण्यात आलेला ऊस बजाज नोबेल साखर कारखान्याच्या बाहेर मिळाला असून, त्यातला ऊस बेपत्ता होता. पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, या आठजणांच्या टोळीला शोधण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
या संदर्भात अमृताखास गावातील शेतकरी प्रेमपाल यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रॉलीमध्ये ऊस चढवून ते साखर कारखान्याकडे निघाले होते. रात्री साडे नऊच्या सुमारास कुंवरपूर गावाजवळ काही जणांनी मला अडवले. त्यांच्या टोळीत चार महिला आणि चार पुरुष होते. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवल आणि एकाजण ट्रॅक्टर घेऊन गेला.
आरोपी टोळीने शेतकरी प्रेमपाल यांना मारहाण करून बरगदा गावात बागेत चार तास बांधून ठेवले. रात्री दोनच्या सुमारास मोबाईल काढून घेऊन प्रेमपाल यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर पीडित शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात पोहचून तक्रार दाखल केली. पोलिसांना बजाज नोबेल साखर कारखान्याबाहेर प्रेमपाल यांचा ट्रॅक्टर सापडला. पण, त्यातील ७० क्विंटल ऊस गायब होता. ट्रॉलीतून ऊस बजाज कारखान्यात देण्यात आला की नाही, याविषयी स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे चोरी झालेला ऊस कोणाचा होता. यावरून वाद असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्या पार्श्वभूमीवरही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.