ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पाणी बचतीसाठी ठिबक सिंचनला पसंती

कोल्हापूर : अलिकडच्या काळात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या शेतीला भेडसावत आहे. त्यातही ऊस शेतीसाठी अधिक पाणी लागते. वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळाले नाही तर उसाच्या वाढीला फटका बसू शकतो. पारंपरिक पद्धतीने पाटाने पाणी देण्याइतके पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकरी ठिबक सिंचनाकडे वळले आहेत. कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला मोर्चा ठिबक सिंचनकडे वळविला आहे. मात्र, असे असले तरी ठिबक सिंचनाने पाणी देताना काळजी घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञांच्या मते, उसासाठी शक्यतो, १६ मी. मी. व्यासाची इनलाइन ड्रिप वापरणे फायदेशीर ठरते. मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी १.५० मीटर (५ फूट) असावे. तर जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर १.८० मीटर (६ फूट) असावे. दोन ड्रिपरमधील अंतर ४० से. मी. तर ड्रिपरचा प्रवाह ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. उसासारख्या अधिक कालावधीच्या पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन (सबसरफेस ड्रिप सिस्टीम) अतिशय योग्य आहे. तज्ज्ञांच्या मते एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी ताशी १ लिटर प्रवाह देणारे ड्रिपर इनलाइन फायदेशीर ठरते. कमी कालावधीत सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रिपर वापरले जातात. मात्र, ते शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here