ज्योतिबा फुले नगर (उत्तर प्रदेश) : अमरोहा जिल्ह्याच्या बाहेरील दोन साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटावर अक्षरश: लाथ मारली आहे. अगवानपूर साखर कारखान्याने आतापर्यंत केवळ ऊस बिलापैकी केवळ ५४ टक्के रक्कम जमा केली आहे तर, बेलवाड साखर कारखान्याने जेमतेम ५८ टक्के ऊस बिल जमा केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप केला असून, ३१ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिलाचे सर्व पैसे देण्याची ग्वाही दिली आहे.
चालू हंगामात जिल्ह्यातील जवळपास दीड लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ४१० लाख क्विंटल ऊस दिला आहे. त्याचे एकूण बिल १३ अब्ज १२ कोटी रुपयांच्या आसपास जाते. साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ऊस उत्पादकांना जवळपास १० अब्ज रुपये दिले आहेत. आता दोन अब्ज ४८ कोटी रुपयांची देणी थकीत आहेत. पण, साखर कारखाने हे पैसे देण्यास तयार नाहीत. त्यामुळेच ऊस उत्पादक शेतकरी आपल्या उसाच्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करण्याची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी किसान सन्मान दिवसमध्ये ऊस बिल थकबाकीचा विषय चर्चेला आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी उमेश मिश्र यांनी ३१ ऑगस्टपर्यंत सर्व शेतकऱ्यांना १०० टक्के ऊस बिल देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. बिले न देणाऱ्या कारखानदारांच्या विरोधात एफआयआर नोंद करण्याचा इशारा दिला होता.
जिल्ह्याच्या बाहेरी साखर कारखान्याची अवस्था चांगली नाही. अगवानपूर कारखान्याकडून ४७ कोटी रुपयांची तर, बेलवाडा कारखान्याकडून १९ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. अमरोहा जिल्ह्यात एकूण ऊस बिलापैकी ८१ टक्के ऊस बिल जमा करण्यात आले आहे. केवळ जिल्ह्याबाहेरच्या दोन कारखान्यांकडून मोठी थकबाकी आहे. येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ती बिलेही वसूल होतील, असे जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.