कोल्हापूर : चीनी मंडी
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत पावसाने हाहाकार माजवला आहे. कोल्हापूर शहराला बेटाचे स्वरूप आले असून, जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरी वस्त्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस हे प्रमुख पिक आहे. या उसावर जिल्ह्यातील साखर कारखाने आणि एकूणच अर्थकारण चालते. पण, महापुराच्या तडाख्यात ऊस शेतीला प्रचंड मोठाफटका बसला आहे. जिल्ह्यातील जवळपास ४८ हजार हेक्टर ऊस क्षेत्र पुरात बुडाले असून, आता याचा परिणाम जिल्ह्याच्या अर्थकारणावर होणार आहे. आगामी साखर हंगामाला या पुराचा मोठा फटका बसणार असल्याचे मानले जात आहे. साखर उद्योग अचडणीत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था समाधानकारक नाही. त्यातच अनेकांचा हाताशी आलेला ऊस पाण्याखाली गेल्यामुळे ऊस उत्पादकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. उसाबरोबरच जिल्ह्यातील भूईमूग आणि इतरपिकांचीही कोट्यवधींची हानी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीनंतर सर्वच नद्या पात्र सोडून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यातील कडवी, चांदोली, काळम्मावाडी आणि राधानगरी या चारही धरणांच्या क्षेत्रात मोठा पाऊस झाला आहे. परिणामी धरणांमधून मोठा विसर्ग सुरू असून, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी, त्याचा पूर ओसरण्यावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. सोयाबीन आणि भुईमुगाची पिके हातची गेली आहेत तर, जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या काठचा ऊस पाण्याखाली गेल्याने तो वाया गेला आहे. पंचगंगा नदी वाहणाऱ्या करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील नदी काठच्या उसाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात साधारणपणे १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शेती होते. सध्या काही ठिकाणी ऊस पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे तर, काही ठिकाणी ऊस क्षेत्रात पाणी साचून राहिले आहे. यामुळे ऊस पिकाची वाढ थांबण्याचा धोका आहे. या सगळ्याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला होणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.