बिजनौर : उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री चौधरी लक्ष्मी नारायण यांनी शुक्रवारी बिजनौरमधून नव्या ऊस गळीत हंगामाचे उद्घाटन केले. त्यांनी बुंदकी द्वारिकेश साखर कारखान्यातील गळीत हंगामाचे उद्घाटन केले. आणि तेथे पहिल्या दिवशी कारखान्यात ऊस घेऊन पोहोचलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पिक घेवून आलेल्या बैलांना पुष्पहार घालण्यात आला.
चौधरी यांनी सांगितले की, भारतातील एकूण ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेशचे योगदान ४० टक्के आहे. पूर्वी हे योगदान २८ टक्के होते. इथेनॉल उत्पादनाबाबत राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणामुळे काही कारखाने वगळता बहुतांश कारखान्यांना वेळेवर ऊस बिल देण्यास मदत मिळाली आहे.
त्यांनी सांगितले की, गळीत हंगाम सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेशची पश्चिम, मध्य आणि पूर्व अशी तीन भागात विभागणी करण्यात आली आहे. त्यांनी कारखान्यांच्या व्यवस्थापकांना शेतकऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. उत्तर प्रदेशमधील ऊस शेतीचे क्षेत्र २७ लाख हेक्टर इतके आहे. राज्यात १२० कारखाने गाळप करीत आहेत.