सोलापूर : पंढरपूर तालुक्यावर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच दुष्काळाचे सावट जाणवू लागले आहे. सध्या ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. गहू, हरभरा काढणी सुरू झाली आहे. द्राक्ष बागा जोमात आहेत. मात्र, उजनी धरण तळाला गेल्याने उभी पिके मे-जूनपर्यंत जतन कशी करावी? ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यंदा भीमा नदीतून सोलापूर, पंढरपूर मंगळवेढा, सांगोला अशा शहरांसाठी पाणी सोडावे लागणार असले तरी वीजपुरवठा चालू ठेवला जाईल, याची शाश्वती नाही. परिणामी यंदा नवीन ऊस लागवडी अतिशय कमी असून खोडवा, निडवा ऊसही रोटरून शेतकरी मकेसारखी पिके घेण्याच्या मानसिकतेत आहेत.
पंढरपूर तालुक्यात ८६ हजार ९०० हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. यापैकी निम्म्याहून अधिक म्हणजे सरासरी ४६ हजार २७८ हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली येते. तालुक्यातील कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून १० से १५ दिवसांत बहुतांश कारखाने बंद होतील, असे चित्र आहे. यंदा पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे उजनी धरण ६० टक्क्यांवर भरले. मात्र, योग्य नियोजन न झाल्याने भरमसाठ पाणी नदी आणि कालव्यांना सोडले गेले. पाणी सोडणे बंद करावे यासाठी शेतकऱ्यांनी निदर्शने केली होती. सद्यस्थितीत धरणात १७ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे दुष्काळाची गडद छाया दिसून येत आहे.