उसाची काटामारी, सांगली जिल्ह्यात साखरेचा काळाबाजार

सांगली : आधी महापूर आणि त्यानंतर लॉकडाउनमुळे आधीच संकटांना सामोरे जात असणार्‍या शेतकर्‍यांनाच लुटले जात आहे. एकीकडे उस तोडणी मजुर पैशांची मागणी करत आहेत, तर दुसरीकडी एक रकमी एफआरपी मिळत नाही. शिवाय काही कारखान्यांकडून उसाच्या वजनात काटामारी होत आहे. यातून शेतकर्‍यांची कोट्यवधीची लूट होत आहे. यासाठी वजन काट्याची तपासणी वेळेवर होणे गरजेचे आहे. पण वजन माप विभागाचे याकडे सतत दुर्लक्ष होत आहे.

काही अभ्यासकांच्या अंजादानुसार, जिल्ह्यात 16 पैकी 14 कारखान्यात दिवसाला सरासरी 70 हजार टन गाळप होत आहे. शिवाय जिल्ह्यात सरासरी 5 हजार टनांचा रोज काटा मारला जात असल्याचा संशय अभ्यासकांनी व्यक्त केला. त्याचा हिशेब करायचा झाल्यास तब्बल रोज दीड कोटींची शेतकर्‍यांची लूट होत आहे. टनामागे 100 किलोपर्यंतचा काटा मारला जात आहे. जिल्ह्यात एका कारखान्याचे दिवसाला पाच हजार टन व त्यापे़क्षा अधिक गाळप आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्यात सरासरी रोज 500 टनाची काटामारी सहज होत असावी.

अलीकडे मशिनद्वारे तोडणीचे प्रमाण वाढल्याने कटिंगचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. यातही वजन घटवण्याचा प्रकार केला जातो. शिवाय संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करणे, इलेक्ट्रिक रिमोट सेन्सरचा वापर करुन दाब कमी जादा केला जातो. कारखान्यावर वजनमाप अधिकारी गेटवर आल्याची माहिती समजताच यंत्रणा सावध होते. काटा करेक्ट केला जात असल्याचा प्रकारही घडत असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात काही खाजगी काटेवाले साखर सम्राटांच्या कटात सामील आहेत. शेतकर्‍याने बाहेरुन वजन केले तर तो खाजगी वजन काट्यातील कर्मचारी कोणत्या कारखान्याला उस जाणार आहे, त्याची माहिती काढून व्यवस्थापनाला कळवतो. त्यामुळे उस आल्यावर गाळपासाठी कारखानदार पाच ते सहाा दिवस लावतो, त्यामुळे त्या उसाचे वजन आपोआपच कमी होते.

याबाबत बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, जिल्ह्यातील काही कारखाने काटामारी करत असल्याच्या तक्रारी येतात. एक अडीच टनापर्यंत काटा मारला जात असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. एखाद्या शेतकऱ्याने दंगा केल्यास वजन वाढवून दिले जाते. त्यामुळे एफआरपी बरोबर काटामारीविरोधात आंदोलन केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here