पुणे : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. डोळ्यासमोर वाळत असलेला ऊस बघण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहिलेला नाही. पावसाअभावी सर्वाधिक उसाचे क्षेत्र असलेल्या बारामती तालुक्यातील दुष्काळाची दाहकता वाढत चालली असून उसासह अन्य पिके करपू लागली आहेत. निरा खोऱ्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील तब्बल १५ हजार एकरांच्या आसपास ऊस जळाला आहे. त्यामुळे या कारखान्यांचे जवळपास पाच ते साडेपाच लाख टन उसाचे गाळप कमी होण्याची शक्यता आहे. पाऊस असाच लांबल्यास आणखी उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या करखान्यांच्या कार्यक्षेत्रात पाऊस न पडल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. जवळपास १५ हजार एकरावरील ऊस जळाला आहे. त्यामुळे कारखान्यांच्या गाळप हंगामावर परिणाम होणार आहे. दुसरीकडे पाण्याअभावी पुढील वर्षासाठी करण्यात येणाऱ्या आडसाली ऊस लागवडीत तब्बल ३० टक्क्यांची घट झाल्याचे चित्र आहे. निरा खोन्यातील सोमेश्वर, माळेगाव व छत्रपती या कारखान्यांचे ऊसक्षेत्र हे निरा डावा कालवा व निरा नदीवर अवलंबून असते. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील, मोरगाव, सुपे तसेच पुरंदर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ऊस जनावरांना घातला.बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण असे चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील तब्बल चार हजार एकर ऊस पावसाअभावी जळाल्याने जवळपास दीड पावणेदोन लाख टन उसाचा फटका बसण्याचा अंदाज आहे.